अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचा विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला.या खटल्याचा निकाल देताना शुक्रवारी न्यायालयाने पुराव्याअभावी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका केली.
मुंबईमधील जुहू परिसरातील आपल्या घरात जिया ३ जून २०१३ रोजी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी ती केवळ २५ वर्षांची होती. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजसोबतच्या नात्याबाबत लिहिलेले पत्रही पोलिसांना सापडले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी सूरजला याप्रकरणी आरोपी केले होते. तसेच त्याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच आरोपांतर्गत सूरजवर खटला चालवण्यात आला. उच्च न्यायालयाने १ जुलै २०१३ रोजी सूरजची जामिनावर सुटका केली.