शबनम न्युज | पुणे
पुणे महानगरपालिका आणि पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ अभियानाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
केसरीवाडा येथे आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर सलील कुलकर्णी, पीपीसीआरचे डॉ.सुधीर मेहता, उपायुक्त आशा राऊत, महेश सूर्यवंशी, अण्णा थोरात, कुणाल टिळक, आशिष भंडारी, राजीव खेर, श्रीकांत शेट्ये उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, नीटपणे नियोजन केल्यास स्वच्छतेसोबतच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करता येते. विशेषतः प्लास्टिकच्या कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करता येतात. कोरडा कचरा उपयोगात आणून कांडी कोळसा तयार करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनात नीट नियोजन आवश्यक आहे. या क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत, त्यांच्यात महानगरपालिकेने समन्वय साधावा. सर्वांनी मिळून पुणे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरात सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही. शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. राज्य शासन या उपक्रमात सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहर स्वच्छतेचा संकल्प करून प्रत्येकाने शहरासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.