शबनम न्युज | पिंपरी
पूनावळे कचरा डेपो हटाव कृती समिती आणि पूनावळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित पूनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शनिवार दिनांक 18 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी 5 वा. मूक आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पूनावळेकर ग्रामस्थ आणि नागरिकांनी दिला.
सदर मूक आंदोलनाची सुरवात १८ लैटीट्यूड मॉल च्या येथून झाली , त्यानंतर सर्व नागरीक कोयते वस्ती चौक आणि हाय वे च्या जवळ सुद्धा आंदोलनासाठी एकत्र आले होते .
सध्या पूनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले असुन ते अजूनही सुरूच आहे. सुमारे १ लाखाहुन अधिक नागरिक सध्या पूनावळे येथे राहत आहेत. येथील नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आय टी पार्क यामुळे नागरिक या ठिकाणी राहण्यासाठी प्राधान्य देत आहेत, परंतु तेच आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे खराब होण्याची वेळ येताना दिसत आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पापासून विविध इमारती, गृहनिर्माण सोसाइटी, खुप कमी अंतरावर (२०० – ४०० मीटर) आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे ज्यामुळे प्रचंड नैसर्गिक हानी होईल आणि नैसर्गिकरित्या लाभलेलं निसर्गसौंदर्य नष्ट होईल. तसेच पुनावळे येथील बंधाऱ्या मधून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पामुळे शहरातील सर्व नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. सामान्यतः वर्षभर वारे हे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच जवळच असलेल्या वाकड, ताथवडे, हिंजवडी आय टी पार्क, मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.