मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा लातूर पहिला जिल्हा
लातूर (जिमाका): जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 760 प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्यात सर्वप्रथम हे उद्दिष्ट पूर्ण केले असून जिल्ह्यात आतापर्यंत 762 नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना उद्योग उभारणीसाठी सहाय केले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने यासाठी राबविलेल्या कार्यपद्धतीचा ‘लातूर पॅटर्न’ आता राज्यातही राबविण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उद्योग मंत्री ना. सामंत बोलत होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, नितीन वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक प्रवीण खडके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासन आणि बँकांनी समन्वयाने काम करीत नवउद्योजकांना मदत केली ही अतिशय समाधानाची बाब आहे. यामुळे अनेकांच्या कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळणार असल्याचे ना. सामंत म्हणाले. तसेच लातूर जिल्ह्यात या योजनेसाठी राबविलेली कार्यपद्धती राज्यभर राबविण्यात येणार असून लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून योजनेच्या लातूरमधील अंमलबजावणीबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील अतिरिक्त औसा, उदगीर आणि जळकोट येथील एमआयडीसीला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाली आहे. लातूर अतिरिक्त एमआयडीसी, तसेच विमानतळासाठी 9.88 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांसोबत बैठक घेवून निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीचा सूक्ष्म कृती आराखडा सादर करावा. विमानतळासाठी एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या 38 हेक्टर जमिनीवर विकासकामे तातडीने सुरु करावीत. या जागेच्या संरक्षक भिंतीसाठी 8 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करावी, असे ना. सामंत म्हणाले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही ग्रामीण भागातील कारागीरांसाठी अतिशय उपयुक्त असून जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. मोहीम स्वरुपात काम करून या योजनेतून जास्तीत जास्त लोकांना सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही ना. सामंत यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांचा सन्मान
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा लातूर हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँकेचे अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
लातूरच्या नमो महारोजगार मेळाव्यात उद्योजकांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार
मराठवाडास्तरीय नमो महारोजगार मेळावा लातूर येथे 24 फेब्रुवारी 2024 होणार आहे. या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी होवून युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाच्यावतीने जास्तीत जास्त उद्योजकांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सांगण्यात येईल, असे ना. सामंत म्हणाले.
रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याला पूरक उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र बैठक घेणार
लातूर येथे रेल्वे बोगी निर्मिती कारखाना उभारण्यात येत असून याठिकाणी वंदे भारत रेल्वेच्या कोचची निर्मिती होणार आहे. या कारखान्यासाठी आवश्यक पूरक लघुउद्योग लातूर येथे सुरु होण्यासाठी लवकरच मंत्रालयात संबंधित विभागांची आणि उद्योजकांची बैठक घेण्यात येईल, असे ना. सामंत यांनी सांगितले.
उद्योजकांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या
लातूर जिल्ह्यातील उद्योजकांशी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला. यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी मार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती ना. सामंत यांनी उद्योजकांना दिली. तसेच काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.