शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
मुंबई महामार्गालगत चिंचवड येथे ॲटोक्लस्टर जवळील राखीव भुखंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नविन प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. सात एकर जागेवर तेरा मजल्याच्या या अत्याधुनिक इमारतीसाठी मे. सुनिल पाटील ॲण्ड असोसिएट्स या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली आहे.
शुक्रवारी (दि. 16 जुलै) ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव पास करण्यात आला. नविन प्रशासकीय इमारतीसाठी महानगरपालिका ठराव क्र. 632 (दि. 31 मार्च 2021) नुसार 550 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली आहे. या ठरावाच्या अंमलबजावणीस दि. 7 मे 2021 च्या आदेशानुसार मान्यता देण्यात आली. त्यानुसार या कामाच्या निविदापुर्व, निविदापश्चात कामांसाठी तज्ञ वास्तुविशारद यांची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पर्यावरणपुरक तेरा मजल्यांची नविन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. येथे प्रशस्त आधुनिक सभागृह, मिटींग हॉल, उपहार गृह आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मनपा पॅनेलवरील आर्किटेक्ट यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन 1 जून 2021 रोजी कोटेशन नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. यामध्ये चार तज्ञ वास्तुविशारद यांनी सीलबंद दरपत्रक सादर केले होते. यापैकी मे. सुनिल पाटील ॲण्ड असोसिएट्स यांनी 1.95 टक्के इतका लघुतम दर सादर केलेला आहे. त्यांनी अशा प्रकारच्या कामासाठी वास्तुविशारद म्हणून काम केलेले आहे. त्यांची ठराव क्र. 7830 नुसार दि. 16/12/2020 रोजी मनपाच्या पॅनेलवर वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी नविन मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे या कामाचा प्रकल्प आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, पर्यावरण विषयक परवानगी घेणे, जागेचा सर्व्हे करणे, ट्रायल बोर घेणे, स्ट्रक्चरल डिझाईन तयार करणे, पुर्वगणनपत्रक व सखोल अंदाजपत्रक तयार करणे, निविदासंच तयार करणे, निविदा पुर्व बैठक विषयक कामकाज करणे, प्राप्त निविदांची छाननी करुन निविदाकारांची वैधता ठरविणे तसेच वेळोवेळी साईटवर व्हिजीट करुन कामाचा दर्जा उत्तम ठेवणेबाबत कार्यवाही करणे, इतर निविदा पश्चात कामे करणे व सर्व आर्किटेक्चरल कामे करणे या कामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी नविन मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे व इतर अनुषांगिक कामे करणे या कामास मे. सुनिल पाटील ॲण्ड असोसिएट्स यांची तज्ञ वास्तुविशारद म्हणून नेमणूक करणेस तसेच सदरचे कामापोटी एकूण स्विकृत निविदा रकमेच्या 0.50 टक्के फी निविदा पुर्व कामासाठी व 1.45 टक्के एवढी फी निविदा पश्चात कामासाठी अशी एकूण स्विकृत निविदा रकमेच्या 1.95 टक्के एवढी फी सर्व करांसहित अदा करण्याचा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.