शबनम न्युज | पिंपरी
मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य शासनाची ‘राज्य मराठी विकास संस्था’ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या अंकनाद पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा (पर्व-३)चे पारितोषिक वितरण रविवारी करण्यात आले.
रविवार,२९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सायन्स पार्क(ऑटो क्लस्टर) येथे हा कार्यक्रम झाला. मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विज्ञान आख्यान’उपक्रमातील नाटिकाचे तसेच वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण पुणे विद्यापीठाच्या सायन्स ट्रकमधून यावेळी करण्यात आले.
राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी गिरीश पतके, मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संस्थापक मंदार नामजोशी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.आदित्य भोसले, संचिता पाटील, विराज खामकर, विनया जाधव, प्रतिक लांजेवार,यशाली कदम या विविध गटातील प्रथम क्रमांकांच्या विजेत्यांना ११ हजार रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देण्यात आली. इतर क्रमांकाच्या विजेत्यांनाही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे देण्यात आली.
गिरीश पतके म्हणाले, ‘ मागच्या पिढीला गणिताची भीती होती. पाढे शिकून ती घालवायला हवी.आपले प्राचीन वैभव विसरलो आहोत. पण, गणितावर प्रभुत्व मिळवले की अनेक क्षेत्रात पुढे जाता येते.आकडे, पाढे, गणित सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता हा उपक्रम होत आहे, हेही कौतुकास्पद आहे.
मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांनी स्वागत केले. आणि अंकनाद ‘ उपक्रमांची माहिती दिली.
सूत्रसंचालन ऋतुजा कुलकर्णी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले , सायन्स पार्क चे संचालक राजेंद्र तुपे, नंदराज कोळेकर, निर्मिती नामजोशी, सुनील गोडबोले, वैशाली लोखंडे, जगदीश जाधव उपस्थित होते.