राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच्या नावची चर्चा
शबनम न्युज | मुबंई
देशातील राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सर्वांना पुढच्या महिण्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची उत्सुकता आहे. राष्ट्रपती पदावर आता कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता भॅनर्जी यासाठी विरोधकांची मुठ बांधण्याचा प्रयत्न करत असताना आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
‘शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल’, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे.
ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी १५ जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी त्यांनी २२ विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र पाठवले आहे. यात, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन, ओडिशाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे एमके स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, पंजाबचे भगवंत मान आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह २२ प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.