शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरामध्ये डासांचे प्रमाण वाढले असल्याने या डासांपासून डेंगू, मलेरिया, हिवताप अशा प्रकारचे आजार होऊ नये, नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाऊ नये, याकरिता माजी विरोधी पक्ष नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आरोग्य विभागामार्फत या प्रभागात धूर फवारणी करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर फवारणी सुरु करण्यात आली तसेच दर दोन दिवसात धूर फवारणी व औषध फवारणी करणार असल्याचे आश्वासन आरोग्य विभागामार्फत देण्यात आले.
नाना काटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते की, प्रभागात अजूनही काही ठिकाणी खोदकामामुळे व खड्ड्यांमुळे पावसाचे किंवा वापरलेले पाणी साचून डबके तयार झाले आहेत. त्या डबक्यातून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात, या नागरिकांच्या आरोग्याच्या बाबीचा विचार करता डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी प्रभागांमध्ये दररोज धुर फवारणी, औषध फवारणी करण्याचे आदेश देण्यात यावे, त्यांच्या या मागणी ची तत्परतेने दखल घेत महानगरपालिकेचे आरोग्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक 28 मध्ये धूर फवारणी औषध फवारणी सुरु करण्यात आली.