शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील समिता स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन विविध जातीधर्मातील प्रतिष्ठीतांच्या सहभागाने साजरा करण्यात आला.
राज्य पुरस्कारार्थी ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रभाकर ओव्हाळ, वाकड मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त शब्बीरभाई शेख, बायबल सोसायटी ऑफ इंडियाचे बोर्ड डायरेक्टर आणि ख्रिश्चन एकता मंच (महाराष्ट्र राज्य) माजी अध्यक्ष महेश बेंजामिन, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मोनिका बेंजामिन, वाकड थेरगाव येथील दंततज्ज्ञ डॉ. नुपूर तिवारी(झारखंड कन्या) तसेच माळी समाजातील कार्यकर्त्या समिता राजेंद्र गोरे आणि मराठी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अमिन खान यांच्या हस्ते एकत्रितपणे सोमवारी(१५ ऑगस्ट) ध्वजारोहण करण्यात आले.
वाकड पिंकसिटी रोडवरील पलाश प्लस कॉम्प्लेक्स मधील समिता स्पोर्ट्स फाउंडेशनच्या कार्यालयाच्या प्रांगणात तिरंगा सकाळी आठ वाजता फडकविण्यात आला. यावेळी पिस्टल शूटिंग ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू भगिनी केतकी गोरे व कस्तुरी गोरे, चित्रिकरण दिग्दर्शक सिकंदर खान, सुतार समाजातील कार्यकर्ते महेश भागीवंत आदि मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास सर्व प्रांतातील आणि जातीधर्मातील एकजुटीच्या विजयाचे जगातील एकमेव उदाहरण असून ती एकता, समता, बंधुता टिकविण्याचे सामर्थ्य भारतीयांमध्ये असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी सांगितले. भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो अशा सदिच्छा शब्बीरभाई शेख यांनी व्यक्त केल्या. स्वतंत्र राष्ट्रासमोरही अनेक आव्हाने असतात त्याचा संदर्भ देत महेश बेंजामिन यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्तीसाठी स्वातंत्र्य संग्रामासारखा लढा उभारावा लागेल असे सांगितले।
समिता गोरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.