मराठा साम्राज्याचा विस्तार- ऐतिहासिक देखाव्याचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण
शबनम न्युज | पुणे
केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे पाच दिवसांच्या पर्यावरण पूरक श्री गणरायाची भक्तिभावाने आराधना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज , हिंदवी स्वराज्याचा विस्तार ही एकत्रित संकल्पना घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. धनंजय वर्णेकर, सचिव श्री ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री राम रैना, संचालिका सौ.शितलताई वर्णेकर, विश्वस्त सौ.राजश्रीताई काळभोर, उपप्राचार्या सरबजीत महल, व्यवस्थापन कार्यकारी रत्ना माने यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
ज्ञान, बुद्धी,कला व संपन्नता देणाऱ्या श्री गणेशाच्या या पाच दिवसांच्या उत्सवकाळात विद्यार्थी व शिक्षकांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवणे, चित्रकला, श्री गणेशा सजावट, मेहंदी, रांगोळी, अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे पालक सभासद, माजी विद्यार्थी, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील नामांकित अशा व्यक्तीमत्वांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरतीचे आयोजन केले गेले.
हिंदवी स्वराज्याचा विस्तार, गडकिल्ले, व शिवरायांचे शिलेदार यांना मोशन रोबोटिक्स तंत्रज्ञानाची जोड देत सर्वोत्कृष्ट असा हालता देखावा सादर केला.
विशेष म्हणजे शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या हस्त व ज्ञानकौशल्याचा वापर करून आपला इतिहास, संस्कृती व आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य मिलाफ घालत देखाव्याचे सादरीकरण केले.
शाळेशी निगडित असलेल्या समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी या उत्तम आयोजनाचे भरभरून कौतुक केले.
शेवटच्या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी वायोलिन वादन, सिंथेसायझर वादन, हार्मोनियम वादन, भरतनाट्यम, कथक, सुगम गायन अशा विविध कलाप्रकाराच्या सादरीकरणद्वारे श्रीगणेशाची आराधना करून उपस्थितांची वाहवा मिळवली. श्री गणेशाचे आराधना गीत व छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा पोवाडा शालेय शिक्षक श्री परिक्षित कुंभार यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवर अतिथींच्या हस्ते पालखीतून पारंपारिक ढोल लेझीम पथकाच्या गजरात श्री गणरायाची सवाद्य मिरवणूक काढली व भक्तिमय वातावरणात शाळेच्या प्रांगणातच तयार केलेल्या विसर्जन कुंडात श्री गणरायाचे मनोभावे विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे बाप्पाला अवाहन केले.
या संपूर्ण उत्सवाचे यशस्वी आयोजन व संकल्पनात्मक सजावट शाळेच्या इवेंट कमिटीने व शिक्षकांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुरेखा आवटे व विभा दवे यांनी केले.