शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
वायसीएम रुग्णालयात गैरप्रकार व मानधन नियुक्ती डॉक्टरांची मक्तेदारी थांबवण्यात यावी, तसेच वारंवार मुदतवाढ घेऊन रुग्णालयात ठाण मांडून बसलेल्या या डॉक्टरांना पुन्हा वायसीएममध्ये नियुक्त करू नये, तसेच नवीन डॉक्टर भरतीप्रक्रियेत कसे येतील आणि त्यांना कशी संधी मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड मनपाचे मा. उपमहापौर तुषार हिंगे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड मनपाच्या माध्यमातून शहरातील गोर गरिब गरजू रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय उभारलेले आहे. या रुग्णालयात अधिकाधिक चांगली सेवा व जास्तीत जास्त सुविधा रुग्णांना मिळाव्यात, चांगले डॉक्टर उपलब्ध व्हावेत. यासाठी मनपाच्या माध्यमातून येथे पदव्यूत्त्यर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाकडून या रुग्णालयासाठी सातत्याने खर्च केला जातो. गोर-गरिब रुग्णांना येथे चांगल्या सुविधा मिळाव्यात. हा त्या पाठीमागचा हेतू निश्चित मनपाचा आहे.
प्रत्यक्षात वायसीएम रुग्णालयाचा कारभारावर मनपा प्रशासनाचा वचक राहिलेला दिसत नाही. आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्त यांचे कोणतेही नियंत्रण नाही. चुकीच्या पध्दतीने येथे कामकाज सुरू आहे. या रुग्णालयात एकूण 6 CMO (मुख्य वैद्यकीय अधिकारी) आहेत. परंतु, त्यापैकी एक CMO वगळता इतर डॉ. सुजित कल्हापुरे, डॉ. अनंतकुमार गव्हाणे, डॉ. सचिन इंगळे, डॉ. सचिन पाटील, डॉ. सुमेद गायकवाड या 5 डॉक्टरांची मानधनावर नियुक्ती झालेली आहे.
मानधन किंवा कंत्राटी तत्त्वावर महापालिकेत नियुक्ती देत असताना ती 6 महिने करार पध्दतीने नियुक्ती होते. त्यानंतर पुन्हा प्रक्रिया राबवून इतर डॉक्टरांना संधी दिली जाते. परंतु वायीसीएमसारख्या मोठ्या रुग्णालयात प्रशासनाला याचा विसर पडलेला दिसतो. कारण, या डॉक्टरांना मनपा प्रशासन वारंवार मुदतवाढ देत आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी प्रथम नियुक्ती झालेले डॉ. सुजित कल्हापुरे यांना 5 वेळा मुदत वाढ दिली गेली. तर डॉ. अनंतकुमार गव्हाणे, डॉ. सचिन इंगळे, डॉ. सचिन पाटील यांना 4 वेळा मुदतवाढ, तर डॉ. सुमेद गायकवाड यांना तिस-यांना नियुक्ती देण्यात आली.
वायसीएम रुग्णालयात विविध आजाराचे, तसेच विविध वर्गातील रुग्ण येतात. यामध्ये अशिक्षित व गरिब रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. वायसीएम रुग्णालयात महत्त्वाच्या ठिकाणी मानधनावर नियुक्त डॉक्टर काही खासगी रुग्णालयाचे हस्तक बूनन येथे काम करत असल्याचे दिसून येते. रुग्णांना अनेक तपासण्या, चाचण्या, पुढील उपचार आणि औषधांसाठी ठराविक खासगी डॉक्टर किंवा रुग्णालयाकडे पाठविण्याचा गैरप्रकार वायसीएममधून सुरू असून या सगळ्याला सर्वस्वी येथे ठाण मांडून बसलेले मानधनावरील डॉक्टर व त्यांची निर्माण झालेली मक्तेदारी कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारांमुळे रुग्णालयाची प्रतिमा मलिन होते. प्रशासन किंवा रुग्णालय अधिष्ठाता यांचा यावर कोणताही वचक दिसत नाही.
या अशा संपूर्ण प्रकारात गांभीर्याने लक्ष घालून आणि येथे सुरू असलेले गैरप्रकार तात्काळ थांबविले गेले पाहिजेत. वारंवार मुदतवाढ घेऊन रुग्णालयात ठाण मांडून बसलेल्या या डॉक्टरांना पुन्हा वायसीएममध्ये नियुक्त करू नये, तसेच नवीन डॉक्टर भरतीप्रक्रियेत कसे येतील आणि त्यांना कशी संधी मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, असेही तुषार हिंगे यांनी नमूद केले आहे.