शबनम न्युज | आळंदी
दि. २६/०१/२०२३ शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्व पदाधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कुस्ती खेळाडू व प्रशिक्षक पै.अभिषेक फुगे हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत माजी विद्यार्थी हॉलीबॉल पटू दशरथ वाघोले हे उपस्थित होते. पैलवान अभिषेक फुगे यांनी ध्वजारोहण केले. वाद्यांच्या गजरामध्ये राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले.
प्रथमतः विद्यार्थ्यांमार्फत पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. त्यानंतर राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत कवायत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ड्रिल सादर केले. तर राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थी वैष्णवी मुंडकर, ऋतुजा ढेपे,गौरी कांबळे, वैष्णवी मुंढकर, वैष्णव खराटे व भक्ती खंडागळे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. आदित्य स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पै.अभिषेक फुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले व्यक्तिमत्व घडवून आपण शासकीय सेवेमध्ये सहभागी होऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून कथन केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संधी नाकारून त्यांनी आपल्या गावामध्ये कुस्ती प्रशिक्षण संस्था स्थापन करून तालमीमध्ये मल्लांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. सध्या ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत आलेले माजी विद्यार्थी दशरथ वाघोले यांनीही विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून आपले आरोग्य कसे उत्कृष्ट राखले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय विशाल तांबे आणि सचिव माननीय वैभव तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संचालक व खजिनदार मयूर ढमाले, प्रशासकीय संचालक प्रा.राजीव पाटील, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे, मुख्याध्यापक अतुल पानसरे आणि मुख्याध्यापिका शीतल पाटील, हे उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये शिक्षण संकुलातील शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, आदित्य इंग्लिश स्कूल आणि राजा शिवछत्रपती विद्यालय या शाखांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव बरकडे यांनी केले, तर प्रा. दिलीप बारी यांनी सर्वांचे आभार मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.