शबनम न्युज | पुणे
कुरकुंभ येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील भराव पुलावर एलपीजी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या नादुरुस्त वाहनाला मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये मागील बाजूने धडक दिलेल्या वाहनाची समोरील बाजू पूर्णपणे दाबली गेल्याने चालक अडकून पडला होता.
ग्रामस्थांच्या शर्तीच्या प्रयत्नाने त्याला बाहेर काढण्यात यश आले असून, चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून,त्याला दौंड येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
कुरकुंभ भराव पुलावर एलपीजी सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 12 टी.व्ही. 2851 हा नादुरुस्त झाल्याने सावकाश जात असल्याने मागील बाजूने येणा-या ट्रक क्रमांक एम. एच.9 बी.सी. 9342 ला अंदाज न आल्याने जोडदार धडक दिली. यामध्ये समोरील बाजू दाबली गेल्याने वाहन चालक अडकून पडला होता. दरम्यान, महामार्ग आपत्कालीन व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला असून, ग्रामस्थांनी याबाबत गंभीर आक्षेप घेतला आहे. तासभर उलटून देखील रुग्णवाहिका न आल्याने जखमी चालक रस्त्यावर पडून असल्याचे चित्र आढळून आले. कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका अगदी हाकेच्या अंतरावर असताना, देखील मदतीला न आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.