शबनम न्युज | पुणे
आज अखेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबत मोठी चर्चा झाली. महायुतीत झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे निश्चित झालं. त्यामुळे आज आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. आढळराव पाटलांसोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा चुरशीचा सामना होईल.