शबनम न्युज | बारामती
बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती मधील कन्हेरी मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. १९६७ पासून या मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्याची पवार कुटुंबीयांची परंपरा आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, राजेंद्र पवार असे पवार कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.
अवघ्या देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. यातच अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात केली.
१९६७ पासून मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला जातो. शरद पवारांना बारामतीकरांनी सहा दशके साथ दिल्याबाबत त्यांचे आभार आहेत, असे सांगत दुष्काळ जाऊन शेतकरी वर्गाचे चांगले दिवस येऊ दे, असे साकडे घातल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. लोकशाही आहे. परंतु, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच निवडणूक आयोगाला विनंती आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेवर बोलताना, माझे कुठल्याही विधानाला एकच म्हणणे आहे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.