शबनम न्यूज , प्रतिनिधी – पुणे लोकसभा :
पुणे लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्यावतीने पुणे महानगरपालिकेतील माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनिस सुंडके यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले, भव्य अशी मोटर बाईक रॅली काढून आपली प्रचार यंत्रणा सक्षम असल्याचे दाखवून दिले. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत असतानाच वंचित बहुजन आघाडी वतीने वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार अशी चर्चा होत असतानाच आता अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. अनिस सुंडके हे मागील 25 वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती पद असे अनेक पदे भूषविले असून पुणे शहरातील विविध भागांचा त्यांना परिपूर्ण अभ्यास आहे. तसेच पुण्यातील समस्यांबाबत त्यांना चांगली जाण असल्याने ते पुण्यात अत्यंत ताकदीने निवडणूक रिंगणात असणार यात शंका नाही तसेचअनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे महायुती ,महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांना मिळणारी मुस्लिम मते आता विभागली जाणार आहे तसेच दलित मते ही विभागली जाणार असल्याने विरोधकांना अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे धडकी भरली असल्याची चर्चा पुणे शहरात होत आहे. जनसामान्यात वावरण्याची सवय तसेच सर्वसामान्यांची प्रश्न जाणून घेऊन ती तातडीने सोडविण्याची तत्परता, मनमिळाऊपणा यामुळे अनिस सुंडके येणाऱ्या काळात पुण्यात वेगळेच राजकीय वातावरण तयार करणार यात शंका नाही. अनिस सुंडके यांचा प्रचार पुण्यातील विविध भागात सुरू झाला असून त्यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद हा प्रचंड आहे. प्रचंड उत्साहात त्यांचा प्रचार हा ठिकठिकाणी सुरू आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर विरुद्ध वसंत मोरे विरुद्ध आणि अनिस सुंडके अशी चौरंगी लढत पाहण्याचा पुणेकरांना योग आला आहे.