शबनम न्युज | पुणे
“मी खासदार झाल्यावर पुणेकरांच्या सर्व समस्या सोडविण्यावर भर देणार. जर मी पुणे शहराचा खासदार होतो, तर नागरिकांना सर्व समस्यांमधून मुक्त करणार, असे आश्वासन एमआयएम पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी दिले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे आणि एमआयएम पक्षाकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके या चारही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रॅली पदयात्रा काढण्यात येत आहे.
याप्रसंगी बोलताना एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले की, “पुणे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, बेरोजगारी यासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी पुणे शहराचा खासदार झाल्यावर पुणेकर नागरिकांना सर्व समस्यांमधून मुक्त करणार, तसेच देशभरातील विविध महान व्यक्तीची स्मारके आहेत. या स्मारकाच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रत्येक स्मारक प्रेरणा देत आले आहेत. त्यामुळे मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतान यांचे कार्य लक्षात घेऊन मी भव्य स्मारक उभारणार, असेही ते म्हणाले.