शबनम न्युज / पिंपरी
सरकारी व खाजगी असा भेदभाव न करता सरसकट ज्यांना आवश्यकता आहे अशा कोरोना रुग्णांना मोफत प्लॉझ्मा पुरविण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात राजू मिसाळ यांनी नमूद केले आहे कि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहेत. महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णांलयामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूवर जीवनदान ठरणाऱ्या रक्तातील प्लॉझ्मा घटक प्रभावी ठरत आहे. जे रुग्ण कोरोना रोगापासून मुक्त झाले आहेत त्या रुग्णांच्या २८ दिवसानंतर रक्तांतील प्लॉझ्मा हा कोविडच्या गंभीर रुग्णांस लाभदायी ठरतो. रक्तातील प्लॉझ्मा काढण्यासाठी मनपाचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दोन मशीन कार्यरत आहेत. सध्या कोविड रुग्णांना प्लॉझ्माची जास्त आवश्यकता भासत आहे. प्लॉझ्माबाबत अधिक माहिती घेतली असता, जे कोविड रुग्ण सरकारी रुग्णालयात आहेत, त्यांना मोफत प्लॉझ्मा देण्यात येतो. खाजगी रुग्णांलयातील रुग्णांना २०० एम.एल. प्लॉझ्मासाठी ६०००/- रुपये आकारण्यात येतात. तर १०० एम.एल. प्लॉझ्मासाठी ३,०००/- रुपये आकारण्यात येतात. आपण स्वत: प्लॉझ्मा डोनर घेऊन गेलो तरी खाजगी रुग्णांलयातील रुग्णांना वरील प्रमाणे फी आकारण्यात येते.
वस्तुत: खाजगी रुग्णांलयात उपचार घेणारे रुग्ण हे आपल्याच शहरातील नागरीक आहेत, केवळ ते खाजगी रुग्णालयात कोविडवर उपचार घेत आहेत. म्हणून त्यांना प्लॉझ्मासाठी दर आकारणे अन्यायकारक आहे.सध्या कोरोनामुळे शहरातील उद्योग धंदे बरेच दिवस बंद होते त्यामुळे ब-याच नागरीकांचे रोजगार गेलेले आहेत. त्यांची आर्थिक परीस्थिती बिकट झालेली आहे. त्यात प्लॉझ्मासाठी खर्च करणे सर्वसामान्य नागरीकांना अवघड झालेले आहे. तरी आपणांस विनंती आहे की, सरकारी व खाजगी असा भेदभाव न करता सरसकट ज्यांना आवश्यकता आहे अशा कोरोना रुग्णांना मोफत प्लॉझ्मा पुरविण्यात यावा. अशी मागणी राजू मिसाळ यांनी केली आहे