शबनम न्युज | लातूर
लातूर | प्रतिनिधी
राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक असून सर्वात जास्त शेतकरी सोयाबीनचे पिक घेतात. राज्यात सर्वसाधारणपणे ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जात असून प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागाचे यात प्राबल्य आहे.
सोयाबीन पिकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढविण्याबरोबरच मूल्य साखळी विकासासाठी व्यापक प्रयत्न व चर्चा होण्याच्यादृष्टीने मा.ना.श्री.दादाजी भुसे, मंत्री (कृषि), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या उपस्थितीत कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषि महाविद्यालय, लातूर येथे दि.१६ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९.३० वा. राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचे आयोजन करणेत आले आहे.
सदरील परिषेदमध्ये सोयाबीन पिकासाठी विकसीत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, सोयाबीन पिकाशी निगडीत यांत्रिकीकरण, सोयाबीन प्रक्रियामधील संधी व आव्हाने, विपणन व वायदे बाजार इ. बाबीवर अधिक उत्पादन घेणारे शेतकरी, उद्योजक, सोयाबीन व्यवसायातील तज्ञ, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
सदरील परिषेदेचे उदघाटन राज्याचे कृषि मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे हे करणार असूनअमित देशमुख, मंत्री वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य. तथा पालक मंत्री,लातूर यांच्या अध्यक्षतेखाली परिषद संपन्न होणार आहे. सदर परिषद विश्वजीत कदम कृषि राज्य मंत्री, संजय बनसोडे राज्यमंत्री, एकनाथ डवले सचिव (कृषि), अशोक ढवण कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व आयुक्त (कृषि) धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
सोयाबीन परिषदेमध्ये तज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, शास्त्रज्ञ, वायदेबाजार विश्लेषक व उद्योजक यांच्यामध्ये विविध विषयावर थेट परिसंवाद होणार असून या परिषदेमुळे सोयाबीन पिकाबाबत महाराष्ट्र शासनाचे भविष्यातील धोरण ठरविणे सुकर होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यूट्यूब चैनल www.youtube.com/C/AgricultureDepartmentGoM वरून होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने विकास पाटील, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.