शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- राज्यातील सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्या दिशेने लसीकरण विभागाची वाटचाल सुरू असून डिसेंबरअखेर म्हणजेच येत्या 20 ते 22 दिवसांत राज्यातील 100 टक्के जनतेला पहिला डोस मिळणार आहे. सध्या एकूण लाभार्थ्यांपैकी 85 टक्के जनतेला पहिला डोस मिळाला आहे. उरलेल्या 15 टक्के नागरिकांना डिसेंबरअखेर पहिला डोस मिळणार आहे.
राज्यात 18 व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या 9 कोटी 14 लाख 35 हजार इतकी आहे. त्यापैकी 7 कोटी 65 लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. अजून 1 कोटी 47 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. मात्र, राज्य शासनाने लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे कारण ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचे राज्यावर आलेले संकट हेदेखील आहे.दररोज दहा लाख लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे. त्यापैकी 60 टक्के डोस हे पहिल्या लसीकरण नागरिकांना देण्यात येत आहेत. तर उरलेले 40 टक्के डोस हे दुसर्या लसीकरणाचे आहेत, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.