शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगुल वाजले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर चौघा जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध
प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले आहेत. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. आज (बुधवारी) पात्र उमेदवारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार , राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासह अनेक दिग्गज जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवार यांच्यासह सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
अजितदादांची एकहाती सत्ता
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे. आता यंदा हे चित्र पालटणार, की यावेळीही ही निवडणूक अजित पवारच जिंकणार हे पाहाणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर
– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022
– मतमोजणी : 4 जानेवारी 2022
बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2