शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- शिव-फुले-शाहू भीमसृष्टीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महापुरुषांच्या कार्याची महती उत्कृष्ट प्रकारे मांडली असून यामुळे वैचारीक पिढी घडविण्यासाठी बळकटी मिळेल असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या कामाची तयारी व आढावा घेण्यासाठी स्मारकाशी संबंधित महानगरपालिकेचे सर्व अधिकारी तसेच मान्यवरांची संयुक्त बैठक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीत बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक एकमेव द्वितीय स्मारक होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच हे स्मारक भव्य व रचनात्मक व्हावे यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसेवक संतोष लोंढे, सचिन चिंचवडे, नगरसदस्या गीता मंचरकर, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे तसेच भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी महानगरपालिकेच्या वतीने भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी माता रमाई यांच्या त्यागाबाबत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यासाठी सदैव दिलेल्या साथीबद्दल गौरवौद्गार व्यक्त केले आणि शहरात या महान त्यागमूर्तीचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यात येत असल्याबद्दल त्याचा शहरास अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी माता रमाई यांच्या पिंपरी येथील नियोजित स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी मागणी केली. त्यामध्ये बापू गायकवाड, देवेंद्र तायडे, धम्मराज साळवे, प्रकाश ओव्हाळ आदींनी बैठकीत आपले मत व्यक्त केले.