शबनम न्यूज : मुंबई (दि.१८ डिसेंबर) :-
वृत्तसेवा
संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचा निषेध नोंदवत याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही केंद्र सरकारला खडे बोल सुनावत याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनीही याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली. भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या नराधमांनी हे कृत्य केले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी गेलेल्या लोकांना अडविणे योग्य नाही. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो. याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.