शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (०१ जानेवारी २०२२) :- श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड, पु.ना.गाडगीळ अॅड सन्स, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ ‘चिंचवडचा राजा’ चिंचवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘३१ डिसेंबरच्या रात्री रात्री ८ ते १२ या वेळेत ‘रक्तदान शिबिराचे आयोजन, कोजागिरी पौर्णिमेसारखे मसाला दूध वाटप, स्वातंत्र्य दिना सारखी जिलबी आणि रात्री बारा वाजता श्री गणेश आरती आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवरायांची ‘शिववंदना’ असा आगळावेगळा उपक्रम चिंचवडगावातील पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स यांच्या कला दालनात करून एक अनोख्या पद्धतीने ‘२०२२’ या इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, डॉ.अविनाश वैद्य, डॉ.सौ मनाली वैद्य, सौ आशाताई पात्रुडकर, महेश मिरजकर, प्रथमेश रत्नपारखी, ऋषी डोळे, समीर वरेकर आदि प्रमुख कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
सदर उपक्रमास अतीशय चांगला व उस्फुर्त प्रतिसाद चिंचवडकरांनी दिला व दरवर्षी म्हणजे प्रत्येक ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत याच पद्धतीने करण्याचा संकल्पही यावेळी उपस्थितींनी केला.
सर्व साधारणपणे ३१ डिसेंबर ही रात्र अतिशय वाईट पद्धतीने साजरी करण्याचा पायंडा, प्रघात पडला आहे दारू/मद्य प्राशन, पार्टी, दोन चाकी चार चाकी वाहने वेगात वेडीवाकडी चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, वाहतुकीचे नियम मोडण्यातील धन्यता, चौका चौकात पोलिस यंत्रणेवर ताण, आवाज मर्यादेचे उल्लंघन, आपली भारतीय संस्कृती पायदळी तुडविणे, आचकट विचकट नाच गाणी.. सुजाण माणसाचा श्वासचं गुदमरतो, काही तरी नक्कीच चुकतेय!
यावर चांगला पर्याय म्हणून चिंचवड मधे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ‘रक्तदूत’ डॉ.अविनाश वैद्य व त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ.सौ मनाली वैद्य व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चिंचवडगावात प्रथमच हा उपक्रम सुरु केला आहे.