कापडी पिशव्यांचा वापर करा, प्रदुषण टाळा- महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ जानेवारी) :- भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आढळतो. भाजी विक्रेते प्लास्टिकच्या पिशवीतच भाजी आणि फळे देण्याला प्राधान्य देतात आणि ग्राहकही या पिशव्या सर्रास घरी घेऊन जातात. या पिशव्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे परिसर अस्वच्छ होतोच पण त्याचबरोबर पर्यावरणाची हानी होते. प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही. त्यावर उपाय म्हणून पालिकेने कापडी पिशव्या बनविल्या आहे. प्लास्टिक पिशव्या न वापरता प्रत्येकाने कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करू या, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने मा. महापौर व मा. आयुक्त यांनी केले.
सोमवारी कापडी पिशव्या वाटप मोहिमेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडई/ व्यावसायिक ठिकाणे/ मार्केट या ठिकाणी १५० ते २०० कापडी पिशव्या वाटण्यात आल्या. ज्या नागरिकांनी मार्केटमध्ये प्लास्टीक पिशवी आणली होती त्यांना कापडी पिशवी देण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी कापडी पिशव्या मागून घेतल्या तर काहींनी प्लास्टिकच्या पिशव्या मनपा कर्मचा-यांच्या हाती सोपवत कापडी पिशव्याचा आनंदाने स्वीकार केला. ही मोहिम पुढील ८ दिवस सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे.
‘कापडी पिशव्यांचे वाटप हा प्रातिनिधीक उपक्रम असून नागरिकांनी स्वत:च कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावली पाहिजे. घरच्या घरी कापडी पिशव्या तयार करणे सोपे आहे. त्यामुळे दुकानदाराला प्लास्टीकची पिशवी मागण्यापेक्षा एक छोटी कापडी पिशवी सोबत नेली, तर दुकानदारालाही सवय लागेल आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी व्हायला मदत होईल’, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. सर्व क्षेत्रीय अधिकारी व सहा. आरोग्याधिकारी यांचे हस्ते क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडईमध्ये कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.
प्लास्टीक कचरा व्यवस्थापन प्रथम सुधारणा नियम अंतर्गत सन २०२२ पर्यंत सिंगल युज प्लास्टीक वस्तुंना प्रतिबंधीत करण्याकरिता ३० सप्टेंबर २०२१ पासुन ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या आणि ३१ डिसेंबर २०२२ पासुन १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक कॅरीबॅगवर बंदी घालण्यात आली आहे. या अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरामध्ये सुरु आहे. यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास पहिला गुन्हा रु. ५०००/- दंड, दुसरा गुन्हा र.रु १००००/- दंड व तिसरा गुन्हा यांस र.रु २५०००/- दंड व तीन महिने इतक्या मुदतीची कारावास असा दंड आहे. कोणत्याही व्यक्तीने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर केल्याचे आढळल्यास नियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.