वृत्तसंस्था
शबनम न्यूज : पुणे (दि.१६ फेब्रुवारी) :- नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने येत्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरात जमिनीच्या अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी 6 टक्के तर ग्रामीण भागात 10 टक्के वाढ, तर नगरपालिका क्षेत्रात 5 टक्के वाढ प्रस्तावित आहे. या दरवाढीस परवानगी मिळाल्यानंतर येत्या एक एप्रिलपासूनही दर वाढ लागू करण्यात येणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे नवे दर लागू करण्यात येतात,त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाचे रेडीरेकनरचे नवे दर प्रस्तावित केले आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. गतवर्षात झालेल्या खरेदी – विक्री व्यवहारांच्या आधारावर सरासरी नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.आता हा प्रस्ताव मान्यतेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.राज्य शासनाच्या मान्यतेनंतरच ही दरवाढ लागू केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये येत्या काही वर्षात मोठाले प्रकल्प सुरु होत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाऊनशीप स्कीम आदी प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हे मोठे प्रकल्प, नव्याने येणाऱ्या कंपन्या यामुळे ग्रामीण भागात जमिनींचे दर वाढविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पुणे शहारातील रेडीरेकनर दरवाढ ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरवाढ
2017 -18 – 3.64 टक्के 2017 -18 – 15.30 टक्के
2018- 19 – वाढ नाही 2018- 19 – वाढ नाही
2019 -20 वाढ नाही 2019 -20 वाढ नाही
2020-21 – 1.25 टक्के 2020-21- 8.62 टक्के
2021-22 – वाढ नाही 2021-22 – वाढ नाही
२०२२-२३ – 6 टक्के प्रस्तावित 2022-23 – 10 टक्के प्रस्तावित