नवाब मलिक यांच्यावरील कारवाईबाबत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
शबनम न्यूज : मुंबई (दि.२४ फेब्रुवारी) :- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ईडीने केलेली कारवाई अतिशय दुर्दैवी आहे. वडाची साल पिंपळाला लावून नवाब मलिक यांना अटक करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा कारवाईतून विरोधकांना आसुरी आनंद मिळू देणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक अनेक दिवसांपासून केंद्र सरकारविरोधात आपली भूमिका मांडत होते. त्यामुळे ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मलिक यांचा संबंध दाखवून त्यांचे तोंड दाबण्यासाठी ही कारवाई करून अटक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे भुजबळ म्हणाले. अशाप्रकारे लोकशाहीविरोधी वागणे अतिशय निषेधार्ह असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.