वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.०७ मार्च) :- भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेली राजकीय कटुता, एकमेकांच्या नेत्यांवर होणारी टीका आणि येऊ घातलेली महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि.०६ रोजी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने चप्पल भिरकावली. फडणवीस हे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या घटनेचा निषेध ट्विटरद्वारे नोंदवला.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले कि, विरोधी पक्षनेते फडणवीस हे मोठे नेते आहेत.त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही, अशा शब्दांत पवार यांनी संबंधितांना सुनावलं आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2022
Advertisement