शबनम न्यूज : आळंदी ( दि.११ एप्रिल ) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल डूडूळगाव (आळंदी) येथे संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, यांच्या शुभहस्ते, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आणि आदित्य इंग्लिश स्कूल, ह्या शाखांच्या नूतन इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष, मा. श्री. विशाल तांबे यांच्या शुभहस्ते मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, मा. विशाल तांबे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले व लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जपण्यासाठी तसेच शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे सर यांच्या शैक्षणिक विचाराचा प्रसार करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य व भविष्य घडविण्यासाठी ही संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे असे प्रतिपादन केले.
यानंतर मा. खासदार, सुप्रियाताई सुळे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना, आपले शिक्षणामधील अनुभव, त्यावेळची परिस्थिती व वातावरण याबद्दल माहिती सांगत असताना, हे डिजिटल युग आहे, आपणा सर्वांना डिजिटल टेक्नॉलॉजीचे महत्त्व कळाले पाहिजे, ते ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे, त्याचा आपण वापर केला पाहिजे असे सांगितले. मोबाईलमध्ये होत असणाऱ्या उत्क्रांतीची सखोल माहिती देखील यावेळी दिली. फार्मसी अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि भविष्य काळतील वाटचाल यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच वाचनाचे महत्व सांगितले. त्याचबरोबर स्री -पुरुष समानता, महिला सबलीकरण व आत्मनिर्भरता इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. सुसंस्कार एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करायचे असतात, त्यासाठी त्यांनी काही चित्रपटांची उदाहरणे दिली. विध्यार्थ्यानी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊन चांगले करिअर करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या प्रेरणादायी भाषणाला विध्यार्थी -विद्यार्थिनींचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले, प्रा. राजीव पाटील- प्रशासकीय संचालक, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात- शरदचंद्र पवार महाविद्यालय व रामचंद्र पाटील आवटी जुनियर कॉलेज, प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे- ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, मा. अतुल पानसरे- मुख्याध्यापक, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, व वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. भालचंद्र नलवडे तसेच शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल, डुडुळगाव (आळंदी) येथील सर्व शाखेतील शिक्षक, शिक्षकेत्तर सहकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. पोपट घनवट व प्रा. संतोष झावरे यांनी केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.