शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- जयभीमचा घोष, आदीवासी कलाकारांचा तारपा नृत्याचा अविष्कार आणि हेलीकॉप्टर मधून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टर मधून होणारी पुष्पवृष्टी अशा प्रकारे अभिवादन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर पिंपरी चौक, एच.ए. कॉलनी, तसेच दापोडी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, वामन नेमाणे, विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता संजय भोसले, लेखाधिकारी प्रदीप बाराथे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, एच. ए. कंपनीचे अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत सर्व प्रभागामध्ये कचरा संकलन करण्यासाठी प्लॉगेथॉन मोहिम राबवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले .महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयात प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली यामध्ये नागरिक व कर्मचारी अशा २७८१ जणांनी सुमारे २० टन कचरा गोळा केला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.