शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा इमारती, खोल्या, सभागृह शैक्षणिक कारणाव्यतिरिक्त इतर वापराकरिता दिले गेले असल्यास त्याची सविस्तर माहिती मिळावी, असे पत्र आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून महापालिकेच्या वतीने १०५ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये शहरातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. या शाळांच्या इमारती, खोल्या आणि सभागृह शैक्षणिक वापरा व्यतिरिक्त तसेच निवडणूक कामकाज वगळून इतर कोणत्याही कामकाजासाठी वारण्यास व भाडेतत्त्वावर देण्यास बंदी घालण्याबाबत आपण दिलेल्या आदेशाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!.
परंतु, महापालिका मालकीच्या शाळांच्या अनेक इमारती, खोल्या व सभागृह शैक्षणिक कामांव्यतिरिक्त इतर वापरासाठी दिले असल्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या कमी पडत आहेत. तसेच काही शाळांमध्ये दोन वर्ग एकाच वर्गात बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी जागेअभावी दोन सत्रांमध्ये शाळा भरवावी लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेने शैक्षणिक कारणाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी शाळा इमारती, खोल्या किंवा सभागृह दिले असल्यास त्याची सविस्तर माहिती द्यावी.”