शबनम न्युज | मुंबई
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा देणारे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षावर दावा सांगण्यासंदर्भात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला बहुमतासंदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने पक्षाच्या चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय तुर्तास तरी घेऊ नये असं म्हटलं आहे. त्याचसोबत सत्तासंघर्षाच्या याचिकांवर पुढील सुनावणी ८ ऑगस्टला ठेवली आहे.
या सुनावणीत शिवसेनेच्या बाजूने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून कोर्टात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदलेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद आदी मुद्दयांबरोबरच या याचिकेवरही एकत्रित सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिल्याने यासंदर्भातील निर्देश आज न्यायालयाने दिले.