बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हा त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी कायम चर्चेत असतो. नुकतंच त्याने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वतःच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटाची घोषणा केली आहे. कुणालच्या या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे ‘मडगांव एक्सप्रेस’.
कुणालने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. कुणालने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “ही बातमी द्यायला यापेक्षा आणखीन कोणता शुभ दिवस मिळणार नाही. गणपती बाप्पाच्या कृपेने मी माझ्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. त्याबद्दल एक्सेल एंटरटेंमेंटचे रीतेश सिदवानी आणि फरहान अख्तर यांचे मी मनापासून आभार मानतो. ‘मडगांव एक्सप्रेस’चे पोस्टर खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.”
कुणालच्या या नवीन प्रयोगासाठी सगळेच उत्सुक आहेत. सगळेच त्याला यासाठी शुभेच्छा देत आहेत. गेल्याचवर्षी कुणाल खेमू हा ‘लूटकेस’ या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तसेच ‘गो गोवा गॉन’, ‘मलंग’सारख्या चित्रपटातून त्याने विनोदी आणि खलनायकाच्या भूमिकासुद्धा उत्कृष्टरित्या साकारल्या आहेत.