शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पदभार स्वीकारण्यापूर्वीच स्मिता झगडे यांची बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली करून पुन्हा भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेत नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे.
स्मिता झगडे यांना पुन्हा महापालिकेच्या उपायुक्त पदी जैसे थे ठेवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी गुरुवारी काढले आहेत. शासन आदेशात म्हटले आहे कि, प्रदिप बाबुराव जांभळे- पाटील सध्या प्रतिनियुक्ती उपायुक्त वसई विरार महानगरपालिका यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-३९ अ नुसार अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या पदावर दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.प्रदिप बाबुराव जांभळे पाटील यांनी उपायुक्त वसई – विरार महानगरपालिका या पदावरुन कार्यमुक्त होऊन प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.