शबनम न्युज | मुंबई
राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काल उर्फी जावेदच्या वादावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या दुटप्पीपणावर भाष्य करत आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यांनतर आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.
त्या म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यातून आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार ही नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर यांनी म्हटलं आहे.” उर्फी जावेदवर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले.
चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाच्या दुटप्पीपणावर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. याप्रकरणी दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं होतं.