शबनम न्युज | दापोडी
दापोडीत एकास शिवीगाळ करत, दारू पिण्यासाठी पैसे दे, तसेच जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी अलकादरी केटर्स, इनामदार पोटरी जवळ, बोपोडी रोड, दापोडी येथे घडला. याप्रकरणी रियाज लियाकत आदिशहा (वय २६, रा. बोपोडी रोड, दापोडी पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सैफ रैन (रा. दापोडी पुणे), शादाब शेख (रा. दापोडी पुणे) तसेच त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दापोडीत केटर्स चे दुकान आहे. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ :३० वाजण्याच्या सुमारास आरोपी हे त्यांच्या दुकानावर आले व शादाब शेख याने फिर्यादींना शिवीगाळ करत दारू पिण्यासाठी पैसे दे तसेच ‘तुला लई माज आला काय’, ‘तुला जिंदगी प्यारी नाही वाटत’ अशी धमकी देत फिर्यादींवर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांनी बचावासाठी हात वर केले असता, त्यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर, दंडावर व मनगटावर कोयत्याने वार केले यात फिर्यादी हे जखमी असून, आरोपींनी दुकानातील काउंटरच्या गल्ल्यामधून १२००/- रुपये काढून घेतले. तसेच सेसैफ रैन याने त्याच्या हातातील कोयत्याने दुकानातील सामानवर मारून नुकसान केले. तसेच त्यांच्यासोबत असलेले त्यांचे दोन साथीदार तसेच फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ कादिरशहा व बिलाल यांना मारहाण करून दुकानातील सामानाचे नुकसान केले. तसेच त्यानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवत तेथे जमलेल्या लोकांकडे इशारा करून आम्ही येथील भाई आहोत, कोणी पोलिसात तक्रार केली तर आम्हाला जो नडला, त्याला कायमचा तोडला अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करत आहेत.