शबनम न्युज | पुणे
“अधिकारी वर्गाचे समाजामध्ये मोठे योगदान आहे. डॉ. बी. पी. गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन आरोग्य, तसेच सामाजिक सेवेत भरीव योगदान दिले आहे. समाजामध्ये बदल घडवायचा असेल, विधायक कार्य उभारायचे असेल, तर सर्व समविचारी लोकानी एकत्र यावे,” असे मत राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी व्यक्त केले.
आरोग्य विभागातील सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. बी. पी. गायकवाड यांच्या ‘माझी संघर्ष गाथा’ आत्मचरित्राचे प्रकाशन गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. प्रसंगी ज्येष्ठ कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक, प्रसिद्ध वक्ते प्राचार्य यशवंत पाटणे, यशदा येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड, दयानंद कला महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, “गायकवाड यांनी आत्मचरित्र लिहून त्यांना जीवनात भेटलेली माणसे, प्रसंग, अनुभव सांगितले आहेत. त्यांना अनेकांनी मदत केली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कृतज्ञ असणे हा माणसाचा महत्त्वाचा गुण आहे. सेवाकाळात त्यांनी रुग्णांची मनोभावे सेवा केली. त्यांच्याकडे बुद्धांची दया, करुणा आहे. बाबासाहेबांचा विचार आहे.”
बुधाजीराव मुळीक यांनी जात-पात घालवण्यासाठी विचारवंतांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्राचार्य यशवंत पाटणे यांनी मूल्यहीन राजकारणात संविधानाला तडे जात असताना चांगले अधिकारी निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. बबन जोगदंड यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी गायकवाड यांनी विचार मांडले. डॉ. गायकवाड यांनी पुस्तकामागची भूमिका विशद केली. अनिल गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता भालेराव यांनी आभार मानले.