‘स्वच्छता के दो रंग’ उपक्रमांतर्गत ६ हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
शबनम न्युज | पिंपरी
ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते, तर सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी तो कारखान्यामध्ये पाठवला जातो. वर्गीकरण केल्यामुळे कचरा एकमेकांमध्ये मिसळत नाही. त्यामुळे त्याच्यावर तत्काळ प्रक्रिया करता येते. कचरा वर्गीकरणासाठी मोठ्या संसाधनांची आवश्यकता नाही. घरच्या घरी कचरा वर्गीकरण करता येते. या छोट्याशा कृतीचे फायदे मोठे असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी केले.
शहर कचरामुक्त व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याकरीता नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने ‘स्वच्छता के दो रंग’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी यांच्यावतीने शाळा, महाविद्यालयांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून “स्वच्छतेचे दोन रंग- ओला कचरा – हिरवा रंग- सुका कचरा – निळा रंग” याबाबत नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता के दो रंग’ या अभियानाअंतर्गत आज दि. २० रोजी ज्ञानदिप विद्यालय रूपीनगर- तळवडे, म्हाळसाकांत विद्यालय- आकुर्डी, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, यशस्वी इंग्लीश मिडीअम स्कूल मोशी, सरस्वती विद्यालयामधील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्रसंगी, विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरी कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हिरव्या डस्टबीनमध्ये आणि सुका कचरा निळ्या डस्टबीनमध्ये संकलित करणार असल्याचे पालकांच्या स्वाक्षरीचे प्रतिज्ञा पत्र स्मार्ट सिटी टीमकडे सुपूर्त केले.
यावेळी, ज्ञानदीप विद्यालय रूपीनगरचे प्राचार्य सचिव शांताराम भालेकर, खजिनदार दशरथ जगताप, संस्थेचे कार्याध्यक्ष भागवत चौधरी, प्राचार्य सुबोध गलांडे, शिक्षक सुहास चौधरी. म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डीचे प्राचार्य सुनील लाडके, अशोक आवारी, खुशालदास गायकर, सुधीर रोकडे, सिंधू मोरे, मुकुंद बोरुडे. श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले व शिक्षक वर्ग. यशस्वी इंग्लीश मिडीअम स्कूल मोशीचे मुख्याध्यापक शोभा देवकाते, संस्थेचे अध्यक्ष सुभाष देवकाते, शिक्षीका कांचन पवार, रोहीदास बिंदळे, भाग्यश्री भुजबळ. सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्रीम. दातीर व शिक्षक वर्ग यांच्यासह आरोग्य निरीक्षक, स्मार्ट सिटी व स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
“मला ओला आणि सुका कचरा यांच्या वर्गीकरणाचे महत्त्व समजले आहे. मी आजपासून स्वत:चे घर, व्यवसायाचे ठिकाण येथेच कचरा वर्गीकरण करेन. ओला कचरा हिरव्या तर कोरडा कचरा निळ्या डस्टबीनमध्ये टाकून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देईन”. अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव म्हणाले की, कचऱ्याचे वर्गीकरण करताना ओला कचरा आणि सुका कचरा हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. ओल्या कचऱ्यामध्ये स्वयंपाक घरातील शिळे आणि खरकटे अन्न, कुजकी फळे, पालेभाज्या, भाज्यांच्या साली व देठ, वापरलेली चहा पावडर, मांसाहारी पदार्थांचे अवशेष, कापलेली नखे, केसांचा गुंता, नारळाच्या करवंट्या, रिकामी शहाळी अशा अनेक घटकांचा समावेश होतो. हा कचरा हिरव्या रंगाच्या डस्टबिन मध्ये टाकावा. तसेच सुक्या कचऱ्यामध्ये पॉलिथीनच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोलचे तुकडे, लोखंडी वस्तू (तारा,खिळे, पत्र्याचे तुकडे), फुटक्या कपबशा, काचेचे ग्लास, विजेचे बल्ब, ट्युबच्या काचा, फाटलेले कपडे, रबर, कागदी बॉक्स, पुठ्ठा, माती धूळ, इत्यादींचा समावेश होतो. हा कचरा निळ्या डस्टबीनमध्ये टाकला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.