शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील रस्त्याजवळून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. एक तीन वर्षांची मुलगी आणि एक पाच वर्षांचा मुलगा या दोघांना ३५ वर्षीय महिलेने बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता तळेगाव दाभाडे आणि घोरावाडी रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्याजवळून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन वर्षीय मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी असलेल्या महिलेने दोन्ही मुलांना चॉकलेट चे आमिष देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यामुलांपैकी एकाने आरडाओरडा केल्याने महिला आरोपी अपहरण करत असल्याचे स्पष्ट झाले. यांनतर पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.