शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक विद्यालय केशवनगर विद्यालयातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी सार्थक हर्षवर्धन कांबळे याचा 16 फेब्रुवारी रोजी शाळा सुरू असताना विद्यालयातील जिन्याच्या दुसऱ्या मजल्यावरील रेलिंग वरून घसरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते सुरज बाबर यांनी केली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासहित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिलेल्या निवेदनात सुरज बाबर यांनी नमूद केले आहे की मयत विद्यार्थी सार्थक कांबळे यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये महापालिकेमार्फत मदत करण्याची घोषणा महानगरपालिका वतीने करण्यात आली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांच्या घरातील पालकांची झालेली हानी या मदतीने भरून निघणार नाही यासाठी आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन महापालिकेने विचार करायला हवा यासाठी महानगरपालिकेने या मयत विद्यार्थ्यांच्या आई किंवा वडिलांना महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी द्यावी व आयुक्तांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी असे सुरज बाबर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सुरज बाबर यांनी आपल्या निवेदनात मयत विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची जाण आयुक्तांना करून दिली आहे. पालकांचा आधार गेलेला आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्या वृद्ध काळी त्यांना आर्थिक प्रश्नातून जावे लागेल यामुळे त्यांचा आताच आपण विचार करायला हवा .वास्तविक पाहता यापूर्वी आम्ही पिंपरी महानगरपालिकेला सर्व सरकारी इमारतीचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली होती परंतु महानगरपालिकेने तसे केलेले दिसत नाही, परंतु या भीषण प्रसंगामुळे या घटनेला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका जबाबदार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे या घटनेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ही या निवेदनाद्वारे सुरज बाबर यांनी केली आहे.