शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
स्टार्टअप संकल्पनांमुळे उद्योग क्षेत्रात मोठया गुंतवणुकीची संधी उपलब्ध होत असून “स्टार्टअप कॉन्क्लेव्ह”उपक्रमांच्या माध्यमातून नवउद्योजकांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. ऑटो क्लस्टर येथे पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर (PCSIC) तिसर्या वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, ऑटो क्लस्टर व HSBC बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या सहकार्याने “स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२२” चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नवस्टार्टअपला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी, डीवाय पाटील युनिटेकचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश ठाकूर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, पीसीएसआयसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, व्यवस्थापक उदय देव यांच्यासह पॅनल वक्ते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये १७२ स्टार्टअप आणि उद्योजक, १२ पॅनेल स्पीकर, ८ फायनलिस्ट स्टार्टअप्स, ४ प्रदर्शक यांनी सहभाग नोंदविला. प्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते PCSIC वार्षिक मासिकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, PCSIC मार्गदर्शक आणि संबंधित व्यावसायिकांचा सत्कार झाला.
“स्टार्टअप कॉन्क्लेव्ह” दरम्यान झालेल्या चर्चासत्रात “गुंतवणूकदार पॅनेल चर्चा” यामध्ये गुंतवणूक म्हणजे काय करावे आणि काय करू नये, याविषयावर चर्चा झाली. यामध्ये, अध्यक्षस्थानी पॅनल वक्ते म्हणून हेम ऐंगल्सचे उपाध्यक्ष मितेश नांदलस्कर, केनिस व्हेंचरचे संचालक परिमल सेठ, कॅईरस ३ एडव्हायजसचे सीईओ प्रशांत गुप्ता, पार्टनर लॉजिकॉनच्या अलिशा पूनावाला यांनी सहभाग घेतला. टॅप कन्सल्टिंगचे संस्थापक अनिरुद्ध मोडक यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले.
आपण पुरेशी जोखीम घेत आहोत का? या महिला उद्योजक पॅनेल चर्चेत मार्केटॅक्सिस सल्लागारच्या सह-संस्थापक सुहासिनी किर्लोस्कर, रेंट अॅन अटायरच्या संस्थापक लवीना लैटोंजाम, केसरी टूर्सच्या संचालक झेलेम चौबळ, PCSIC व्यवस्थापक उदय देव यांनी सहभाग घेतला. तर बेलेनियम दिवसचे संचालक भावेश कोठारी यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. “PCSIC स्टार्टअप यशोगाथा” यामध्ये ऑटोमॅटन एआय, पार्किंग पाल, Techpose, होरायझन ग्राफिक्स या ४ PCSIC यशस्वी स्टार्टअपने त्यांच्या कथा आणि प्रवास यावेळी मांडला. तसेच त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली.
“प्रोडक्ट इनोव्हेशनवर हँड्स-ऑन” कार्यशाळेचे UX फॅकल्टी ImagineXP च्या श्रुती छिब्बर यांनी संचालन केले. यामध्येएस्वारस्य असलेल्या उद्योजकांसाठी ही एक अप्रतिम १ तासाची हँड्स-ऑन कार्यशाळा घेण्यात आली. ज्यामध्ये नावीन्यपूर्णतेचे महत्त्व आणि चालना देण्यासाठी काही तंत्रांचा अभ्यास करता आला. निवडलेल्या ७ स्टार्टअपसाठी “क्लोज डोअर पिच इव्हेंट” घेण्यात आला. यामधून २०० हून अधिकांना नेटवर्किंगच्या चांगल्या संधी मिळाल्या. तसेच, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना एचएसबीसी बँक आणि बीओबीच्या विविध स्टार्टअप संबंधित सेवांबद्दल माहिती देण्यात आली.
डॉ. अविनाश ठाकूर यांचे देखील उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदित्य मासरे यांच्यासह स्मार्ट सारथी टीमचे सहकार्य लाभले.