शबनम न्युज | पुणे
सहकारी गृहरचना संस्थेच्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन दृढनिश्चय केल्यास ,एकजुट दाखविल्यास स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणी करता येऊ शकते, हे तुळशीबागवाले कॉलनी,सहकार नगर क्र:२ येथील ‘हेमंती ’ गृहरचना संस्थेच्या सभासदांनी दाखवून दिले आहे. संस्थेच्या सभासदांनी स्वयं पुनर्विकासाचे फक्त शिवधनुष्यच उचलले नाही, तर त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलून इतर संस्थांना प्रोत्साहित केले आहे.स्वयं पुनर्विकासाचा हा पुण्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता होत आहे.
‘हेमंती ’ गृहरचना संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती कल्पना लागू, सचिव शौनक ताम्हणे तसेच ‘इंटेलिजंट प्रोजेक्ट डिलिव्हरी सोल्युशन्स एलएलपीचे (आयडीपीएस ) हृषीकेश कुलकर्णी, विजय साने,सौ. अपूर्वा कुलकर्णी, आशिष मोहदरकर, अक्षय कुर्लेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. ‘इंटेलिजंट प्रोजेक्ट डिलिव्हरी सोल्युशन्स एलएलपी‘ ही ‘व्ही.के:ए ‘ ग्रुपची संस्था असून ही संस्था गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकास प्रकल्पात सल्ला आणि निर्मिती सेवा पुरवते.
हेमंती गृहरचना संस्थेची स्थापना १९८४ साली झाली होती. संस्थेच्या सभासदांच्या नवीन; कालानुरूप गरजा, इमारतीचे वय व अन्य निकष लक्षात घेता पुनर्विकासाची गरज निर्माण झाली होती. सभासदांनी एकत्रितपणे स्वयं पुनर्विकासाचा पर्याय निवडला . नवीन इमारतीचे उत्तम दर्जाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून जोमाने सुरू होत आहे. २८ सदनिका असलेल्या ७ मजल्यांची नवीन इमारत अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असणार आहे. फायबर ऑप्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सेवा सर्व सदनिकांना पुरविल्या जाणार आहेत. भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंगची सेवा पुरवण्यात येणार आहे. पर्यावरणाचा विचार करून प्रतिष्ठित आय जी बी सी (IGBC) संस्थेकडून ग्रीन बिल्डिंग प्रमाणित होण्यासाठी ‘व्ही के :ई ‘ या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प बांधकामाचा दर्जा व प्रकल्प पूर्ततेस लागणारा कालावधी या महत्त्वाच्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘व्ही के :ए ‘ ग्रुपच्या ‘आय.पी.डी.एस.’ या बांधकाम क्षेत्रातील निष्णात कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
उत्कृष्ट इमारत आराखडा, प्रकल्पात अद्ययावत सोयीसुविधा व परिसरातील मागणीनुसार सदनिका उपलब्ध करून दिल्याने संस्थेचा नूतन इमारत आराखडा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. बांधकाम जोमात सुरू करत असताना सदनिका विक्रीस उदंड प्रतिसाद मिळाल्याने एकूण २८ पैकी ११ सदनिका बाहेरच्या ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध झाल्या आहेत.
स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणीचा प्रशस्त मार्ग
गेल्या ४ वर्षांत स्वयं पुनर्विकास तत्त्वावर इमारत पुनर्बाधणी करण्यासाठी विविध स्तरावर माहिती उपलब्ध झाल्याने तसेच आवश्यक निधीची तरतूद सहकारी बँकेतर्फे प्रकल्प कर्जाद्वारे सहज व सुलभतेने प्राप्त होणार असल्याने बऱ्याच गृहनिर्माण संस्थांना एक आशेचा किरण दिसायला लागले आहेत . राज्य सरकारकडून १९ सप्टेंबर २०१९ रोजी स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेसाठी मार्गदर्शक तत्त्वे व तरतुदी जाहीर झाल्या, सर्व सभासदांनी एकत्र येऊन दृढनिश्चय केल्यास एकजुटीने इमारत पुनर्बाधणी स्वयं पुनर्विकास तत्त्वावर करता येऊ शकते.संस्थेच्या सभासदांना सदनिका दिल्यानंतर उरलेल्या सदनिका स्वतःच विकून नफा मिळविणे संस्थेला शक्य होते. कारण स्वयं पुनर्विकास केल्याने या व्यवहारात बिल्डर(विकसक) नसतो.तसेच सर्व निर्मिती प्रक्रियेत सहभाग घेतल्याचा आनंद देखील गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना मिळतो.स्वयं पुनर्विकास तत्त्वावर पुनर्बांधणी होणारी ‘हेमंती’ ही पुण्यातील पहिली गृहरचना संस्था ठरली आहे.