शबनम न्युज | पुणे
‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ (आयओडी) नवी दिल्ली या संस्थेच्या फेलो सदस्यपदी पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. नवी दिल्लीतील हॉटेल क्राऊन प्लाझा येथे नुकत्याच झालेल्या आयओडी परिषद व सदस्य बैठकीत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना फेलो सदस्य म्हणून नियुक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आयओडी’च्या वेस्टर्न रिजनचे संचालक विकेश वालिया, पूर्व नौदल कमांडचे कमांडर इन चीफ व्हाईस ऍडमिरल बिस्वजीत दासगुप्ता, जीई एरोस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक अमोल नागर आदी उपस्थित होते.
‘आयओडी’ ही भारतासह परदेशातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना असून, गेल्या ३० वर्षांपासून ही संघटना सदस्य मंडळ समुदायाला सेवा देते. या संघटनेशी जगभरातील ३१ हजाराहून अधिक मंडळ सदस्य जोडलेले असून, भारत, दुबई, सिंगापूर आणि लंडन अशा ठिकाणी वार्षिक परिषदांमधून सदस्य मंडळासंबंधित विविध विषय आणि प्रश्नांवर चर्चा होते. ग्लोबल बिझनेस मीट आयोजित करून जगभरातील उद्योजक, धोरणकर्ते आणि सदस्य मंडळाला एकत्रित आणले जाते. या मंडळ सदस्यांमध्ये वैविध्यता असून, त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, बँकर, सल्लागार, शिक्षणतज्ज्ञ आदींचा समावेश आहे. त्यामुळे नेटवर्किंग आणि व्यवसाय वृद्धी व विस्ताराची संधी एकाच छताखाली उपलब्ध होते.
दरवर्षी भारतातील किंवा परदेशातील मान्यवर व्यक्तींना ‘आयओडी डिस्टिंग्विश्ड फेलो’ म्हणून सन्मानित करण्यात येते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना १९९४ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. पुढे ते भारताचे राष्ट्रपती झाले होते. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा व्यापक आणि वैविध्यपूर्ण अनुभव लक्षात घेऊन, त्यांना संस्थेचे फेलो सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही फेलोशिप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संचालक, व्यावसायिक, धोरण निर्माते इत्यादींसह चांगल्या नेटवर्किंगची संधी देते. या सदस्यत्वामुळे व्यवसाय सल्ला प्रकल्प, इंटर्नशिप्स आणि इतर उपक्रमांतून सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना भारतातील आणि परदेशातील कंपन्यांशी जोडण्यास मदत होणार आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नियुक्तीबद्दल सूर्यदत्त परिवाराच्या त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ‘ही नियुक्ती सूर्यदत्त संस्थेला आणखी चांगले काम विस्ताराने करण्याची संधी देईल. तसेच आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जोडण्यासाठी याचा उपयोग होईल. सर्वांसाठी सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे काम यापुढेही आणखी जोमाने करणार असल्याची भावना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.