शबनम न्युज | पिंपरी
आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) मधील विद्यार्थ्यांनी ऑस्ट्रेलिया येथील ला ट्रॉबे विद्यापीठाद्वारे आयोजित आशिया स्तरावरील ‘टेक्नॉलॉजी इन्फ्युझन ग्रँड इनोव्हेशन चॅलेंज – २०२२’ स्पर्धेत उपविजेतेपद संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.
स्मार्ट सिटी संकल्पनेला पुढे घेऊन जाणे हे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्दिष्ट होते. या स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘दृष्टी’ संघाने सादरीकरण केले. दृष्टिहीनांसाठी सुलभता सुधारणे. प्रवेशयोग्यता आणि स्वातंत्र्य सुधारण्यासाठी त्यांनी ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि ऑडिओद्वारे एखाद्या व्यक्तीच्या सभोवतालच्या रिअल टाइम फीडबॅकसह स्मार्ट गॉगल तयार केला आहे. विशेष म्हणजे, आपला प्रोटोटाईप विकसित करण्यासाठी या संघाला तीनशे डॉलरचे पारितोषिक मिळाले. ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. रोख ऑस्ट्रेलियन दोन हजार डॉलर असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. ‘दृष्टी’ तांत्रिक संघामध्ये अंतिम वर्षाच्या साहिल हेमानी, ईशा मोहोड, अक्षय मुनोत, कौस्तुभ नारखेडे, किशोर श्रीवसरन या विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी देखील पीसीसीओईच्या कोर्मडेसन संघाने द्वितीय क्रमांक पटकावला होता. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दोन्ही वर्षी पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या संघाला संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, अधिष्ठाता इंटरनॅशनल सेल डॉ. अनुराधा ठाकरे, आयटी विभागप्रमुख प्रा.डॉ. सोनाली पाटील, प्रा. अश्विनी लाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या टीमच्या मेंटोर म्हणून प्रा.बबिता सोनारे-जाने यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर पुणे विद्यापीठ आणि पीसीसीओईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.