शबनम न्युज | पिंपरी
मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे महापालिकेच्या नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसमोरच्या नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले. नवीन इमारतीत न्यायालयांची संख्या अकरा होणार असल्याने प्रकरणे लवकर निकाली निघण्याची अपेक्षा आहे. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवारी (दि. १७) नेहरूनगर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालये आहेत. या इमारतींची जागा कामकाजासाठी अपुरी पडत होती. पार्किंगचीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे नवीन प्रशस्त इमारतीत न्यायालय स्थलांतरित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर नेहरूनगर, प्रभाग क्रमांक नऊमधील सर्व्हे क्रमांक १०९, ११० आरक्षित जागेतील महापालिका मालकीची इमारत दुरुस्तीसह फर्निचरची व्यवस्था करून न्यायालयाला देण्यात आली.
यावेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर.एस. वानखेडे, न्यायाधीश एन.आर. गजभिये, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश एम.जी.मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यावेळी उपस्थित होते.