शबनम न्युज | ठाणे
फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालये उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक आहे. या सुविधांचा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यत सर्वांना आनंद घेता येईल व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्कचे नूतनीकरणानंतर लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्यांची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार्कमधील लेझर शो चे उद्घाटन करण्यात आले.