पोलीस अधिकारी असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीची फसवणूक आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आबालू इराणी असं अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव असून त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध शहरांत गुन्हे दाखल असल्याचं समोर आलेले आहे. त्याला निगडी परिसरातून अटक करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिसरामध्ये पोलीस असल्याचं सांगून विविध नागरिक आणि महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात एका स्पोर्ट बाईकचादेखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात सराईत गुन्हेगार इराणी हा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आल आहे.