शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे येथील दोन सराईत गुन्हेगारांकडून 4 पिस्तूल व 14 जिवंत काडतुसे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आली आहे.
प्रमोद सोपान सांडभोर (वय. 33, रा. तळेगाव स्टेशन जवळ, हरणेश्वर वाडी, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवी (वय 30 रा. धनगर बाबा मंदिर, ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लोखंडी गावठी पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे (राऊंड) मिळून आले. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे 4 गावठी पिस्तूल 7000 रुपये किमतीचे 14 जिवंत काडतुसे (राऊंड) व 1 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो कार ही जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक केली. तसेच तपासादरम्यान आरोपी शरद साळवी याने त्यांचे इतर तीन आरोपी साथींधारांसह मध्य प्रदेश राज्यांमध्ये जाऊन सदर गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे आणले असल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपी प्रमोद सोपान सांडभोर यांच्याविरोधात खून तसेच खुनाचा प्रयत्न यासारखे एकूण 8 गुन्हे दाखल असून आरोपी शरद मुरलीधर साळवी यांच्याविरुद्ध खून, मारामारी व बलात्कार असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच बाकी आरोपींचा शोध सुरू असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. सदर आरोपींविरोधात भारतीय हत्या कायदा कलम (3) 25 भादवि कलम 34, 37 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रवीण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रवीण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समीर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणूक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली. सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दरोडा विरोधी पथकास उत्तेजनार्थ रुपये 50 हजाराचे बक्षीस घोषित केले आहे.