शबनम न्यूज – पिंपरी : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शिंदे, फडणवीस, पवार सरकार मध्ये मंत्री पद मिळावे या करीत मोर्चे बांधणी सुरु केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रीमंडळाच्या विस्तारात संधी द्यावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिष्टमंडळ शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ११) अजित पवार यांना मुंबईत जाऊन भेटले.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची पहाटे शपथ घेतली तेव्हा आमदार बनसोडे हे एकमेव आमदार त्यांच्या सोबत शेवटपर्यंत होते. आत्ताही अजित पवार यांनी बंड करुन शपथ घेतली तेव्हा आमदार बनसोडे त्यांच्या पाठीशीच राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना मानणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीस माजी नगरसेवक, सर्व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत आमदार बनसोडे यांना शहरातून राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, असा ठराव करण्यात आला. त्यानुसार आम्ही आमदार बनसोडे यांना संधी द्यावी, अशी मागणी करत आहोत, असे गव्हाणे व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात अजित गव्हाणे, माजी नगरसेवक शाम लांडे, राहुल भोसले, पंकज भालेकर, मयूर कलाटे, निलेश डोके, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, संजय औसरमल, विनय शिंदे, सागर कसबे आदिंचा समावेश होता.
पहाटेचा शपथविधी आणि नुकत्याच झालेल्या शपथविधीचे साक्षीदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांनी २०२४ मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांचं मुख्यमंत्री पदाचा स्वप्न पूर्ण करायचं असल्याचं म्हटलं आहे..अण्णा बनसोडे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनता बघते आहे. त्यामुळेच २०२४ च्या विधानसभेला राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आगामी काळात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.