शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मंडप उभारणीसाठी रस्त्यात खड्डे केले जातात, त्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था होते याकरिता महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व गणेश मंडळांना सहकार्य करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डे मुक्त मंडप उभारणीसाठी प्रशासन वतीने आवाहन करावे, तसेच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना खड्डे घेण्यासाठी आकारले जाणारे दर मनपा प्रशासनाने घेऊ नये अशी मागणी भाजप पिंपरी विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख तथा माजी प्रदेश मंत्री अमित गोरखे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे.
गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील खड्डे मुक्त मंडप उभारणी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे असेही अमित गोरखे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मनपा प्रशासन वतीने गणेश मंडळांना खड्डे घेण्यासाठी आकारले जाणारे दर हे अधिक आहेत ते दर मनपा प्रशासनाने घेऊ नयेत यासह गणेश मंडळांना प्रशासकीय कार्यालयाच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक मंडळे विविध परवाने घेणे टाळतात, शहरातील गणेशोत्सव शांततेत सुरक्षित उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा व्हावा याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मार्फत एक खिडकी योजना राबवावी असेही अमित गोरखे यांनी प्रशासनास सुचविले आहे.